शॅापींग या शब्दात जी श्रीमंती आहे ना ती खरेदी या शब्दात नाही. हा नुसता भाषेचा फरक नाही तर मानसिकतेचा पण आहे. म्हणजे खरेदी ही गरजेच्या वस्तुंची असते आणि शॅापिंग म्हणजे ना मनमोकळी उधळपट्टी असल्या सारखे वाटते कधी कधी.
असो, आज शॅापींग विषयी लिहीण्याचे कारण म्हणजे बर्याच वर्षानंतर उद्या चेन्नई च्या T Nagar ला जायचा प्लॅन आहे.
चैन्नईला जरी वरचे वर येत असलो तरी शॅापींग मात्र टाळत आलोय. किरकोळ खरेदी तशी करतो कधी तरी मात्र या वेळी शॅापींग चा बेत केलाय.
T Nagar म्हणजे आपला पुण्याचा लक्ष्मीरोड. मात्र T Nagar चा पसारा जरा जास्तच.
बर जास्त म्हणजे किती? तर सोन्याचच घ्या. सोनं खरेदी बाबद इकडे साऊथ ला किती वेड आहे याची साधारण कल्पना असेलच. त्या बाबदचे काही किस्से अनुभव आहेत मात्र त्यात न जाता या एका गोष्टीवरुन तुम्हाला अंदाज येईल की संपर्ण भारताच्या वार्षिक सोने खरेदीच्या ४० ते ४५ % एव्हढी खरेदी ही एकट्या चैनईच्या T Nagar भागामधे होते, आता बोला. म्हणजे आपल्या लक्ष्मीरोड चा अभिमान आहेच आपल्याला पण हे T Nagar च प्रकरण जरा जास्त आहे, होय नाना 😀
बर सोन्याची दुकाने किती मोठी असावीत तर त्याला दुकान म्हणायचीच लाज वाटावी एव्हढी मोठी. अगदी मॅाल म्हणाना. त्याच प्रकारचे एक म्हणजे GRT Gold. चार चार पाच पाच मजली सोन विकायचे दुकान म्हणजे काय.
आपल्याकडे पण काही एक दोन मजली दुकाने आहेत पण ती जागे अभावीवरती वाढवल्या सारखीच वाटतात. पण इकडे एका एका फ्लोअर चा रुबाब काही वेगळाच. सोन्याच्या बांगड्यांचा एक आख्खा फ्लोअरच. तर दुसरा फ्लोअर केवळ आंगठी साठी तर तिसरा मंगळसुत्रांसाठी. त्यामुळे सोन्याचा नाद खुळाच, शिवाय या तमीळ व मल्लु लोकांनी आर्धी दुबई व आर्धे सिंगापुर व्यापले आहे त्यामुळे तिकडन येणारे सोने वेगळेच.
आता कपडे. पुरुषांचे काय फार नाही. तोच तो पांढरा शर्ट व पांढरी वेश्टी (लुंगी). आत्ता गेल्या २५ ३० वर्षात कोठे नव्या पिढीसाठी Levi’s , Allen Solly, Peter England वगैरे ब्रॅंड चे शोरूम दिसु लागलेत मात्र तरीही पारंपरिक पोशाख तोच, सनासुदीला लुंगीच. त्यामुळे खरे ॲडव्हेंचर आहे ते साड्यांच्या खरेदी मधे.
पुन्हा तेच आपल्या लक्ष्मीरोडच्या स्वामीनी, दामीनी वगैर्याचा मान राखुन सांगतोय की T nagar मधील पोथीस, नल्ली मधे साडी खरेदी नाही केली तर चैन्नई ट्रिप व्यर्थच.
क्वॅालिटी, व्हरायटी वगैरे गोष्टीत तर जातच नाही मी. ते सोडाच केवळ पोथीस मधील गर्दी च तुम्हाला अचंबित करते. वरती त्या काऊंटर वरची पोऱ्ह ज्या स्पिडने व कल्पकतेने साड्या पॅककरुन,बिलांवर पेंड चा शिक्का मारुन पिशवी गीऱ्हाईकाच्या हवाली करतात ना त्याचे अनेक व्हायरल व्हीडीओ आपण पाहीलेच असतील ते खरेतर प्रत्यक्ष पाहण्याचीच गोष्ट आहे. सरवाना स्टोअर हा ही असाच एक अवाढव्य मॅाल विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंसाठी. तसे इलेक्ट्रीकल साठी एक मार्केट म्हणजे रिची स्ट्रिट. सर्व इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिल स्पेअर पार्टसाठी हे प्रसिध्द, तसेच पुढे गेले की सावकार पेठ हे म्हणजे अगदी गुजरातच. जरा हिंदी पट्ट्यात आल्याचे समाधान. हे होलसेल मार्केट अगदी कुर्डया पापड्या सांडगे सुध्दा मिळतील इथे. इथेच जवळ पॅरिस कॅारर्नर आहे. आणखी एक मनसोक्त खरेदीचे ठिकाण, अगदीच नाही पण साधारण पणे आपले तुलशीबागच. असोSSS नाहीतर हळुहळु मी ट्रीपलीकन ला फिश मार्केट ला घेऊन जाईल तुम्हाला. ते नंतर कधी तरी.
तर परत येऊ T Nagar ला. उद्या बघु गेल्या १० वर्षात बरेच काही बदलले असेल नक्कीच. नवी दुकाने नवे मॅाल असतील पहिल्या पेक्षा आणखी मोठे कदाचीत.
बघु आता किती शॅापिंग होतीये आणि किती खरेदी…….
आणि हो तुम्ही आलात तर रिक्षा करताना जरा जपुन 😀. ते रिक्षावाले एक वेगळेच प्रकरण आहे ते ही नंतर कधी तरी.
चेन्नई शॅापींग

- Advertisement -