आजची रविवारची सकाळ खूपच प्रसन्न होती. काल रात्री म्हणजेच शनिवारी रात्री आईने नेहमी प्रमाणे तेल लावून मस्त चंपी करून दिली होती त्यामुळे खूप मस्त गाढ झोपे लागली त्यामुळेच हा सकाळची प्रसंन्नता असेल. केस तेलकट झाले होते तरी सिल्की सिल्की वाटत होते.
रविवारी सकाळीचा निवांत चहाचा घोट घेतल्या शिवाय व पेपर वर सविस्तर नजर मारल्या शिवाय मी आंधोळीला जात नाही. त्या प्रमाणे चहाचा घोट व पेपर वर नजर मारुन मी आंघोळीला गेलो. रात्रीच्या चंपी ने तेलकट झालेले केस जरा शॅंम्पो ने मस्त धुतले. आंघोळ झाल्यावर बराच वेळ ते मस्त सिल्की झालेले केस सेट करण्यात गेला असावा नक्की लक्षात येत नाही मात्र तेवढ्यात आईचा आवाज आला, ती म्हणाली ‘बस झाला आता, किती वेळ ते केस विंचरतोस, इंद्रपरी सुद्धा एवढा वेळ घेत नसेल , आणि मी हळूच मनात हसलो की काय टाइटल साधलय आईने ,काय तर म्हणे इंद्रपरी.
तसाच केस उडवत डायनिंग टेबल वर येवून बसलो तर माझ्या मोठ्या ताईने हि लगेच एक कॅांप्लिमेट दिली. “तुला ही हेयर स्टाइल खूप छान दिसते आहे. तू केस वाढव जरा.”कायम टॉम ऍड जेरी प्रमाणे भांडणाऱ्या आम्हा दोघांनाही अशा एकमेकांना कॅांप्लिमेटस द्यायची घ्यायची फार सवय नाही. त्यामुळे आजची ताईची कॅांप्लिमेट एैकुन भारी वाटले. मी सुद्धा पूर्ण ॲटिट्युड मधे तीला स्माईल देत ‘थॅंक यू’ म्हटले.
आमच हे संभाषण चालु असतानाच बाबा डायनिंग टेबल वर जॉइन झाले, आज आईने मस्त non veg केले होते. आम्ही सगळे त्याचा पूर्ण आनंद झणझणीत घेत रस्सा वाटी पित होतो, तेवढ्यात त्या वेगळ्याच मूड मध्ये असणाऱ्या माझ्या ताईने परत एक पल्लू सोडलं दिल, वडिलांना म्हणाली की प्रसाद खुपच गोंडस दिसतोय आज. या हेयर स्टाइल मधील फोटो मुलींना पाठवला तर मुलींची रांग लागेल लग्ना साठी, त्यावर आमच्या वडीलांनी फक्त एक स्मित हास्य दिले व रस्सा वाटी तोंडाला लावली गरमागरम रस्स्याचा झुरका ओढला व आपल्या नेहमीच्या पध्दतीने पुढच्या लाईन मधे सिक्सर मारला. “पुरुषाच सौंदय हे त्याच्या कर्तृत्वात असतं, तो कसा दिसतो ह्याच्यात नाही”
वडिलांचे असे वन लाईनर नेहमीच जबरदस्त असतात. याची कल्पना होतीच आम्हाला. पण त्या वयात बरेचसे बाउन्सर जात, नेहमी प्रमाणे हा सुद्धा बाऊंसर च गेला आम्हाला.
साधारण अंदाज जरी आला असला तरी याचा गर्भित अर्थ काही तरी वेगळाच असेल याची मनाला जाणीव झाली होती. पुढचे जेवण नेहमी प्रमाणेच उरकले असावे कारण त्यानंतर डोक्यात वेगळेच विचार चक्र चालु झाले होते. जेवण संपे पर्यंत त्या वाक्याचा अर्थ चाचपडत होतो. मला आठवतंय माझा पुढचा संपूर्ण दिवस त्या वाक्या बद्दल विचार करण्यात गेला.
पुरुषाच सौंदय हे त्याच्या कर्तृत्वात असतं हे शब्दशः कळाले पण कर्तृत्व म्हणजे तरी काय हा मुख्य प्रश्न होताच. यशस्वी होणे म्हणजे कर्तृत्व का? मोठी मोठी कामे केली म्हणजे कर्तृत्व म्हणायचे का ?
कर्तृत्वाचे असे काही ठरवलेले परिमाण पण नाही. मग ते स्थल काळ वेळ सापेक्ष असते का?
असे अनेक प्रश्न व त्यांची उत्तरे आयुष्यातील पुढच्या काळात शोधत राहीलो.
केवळ मोठ्या मोठ्या अचिव्हमेंटस जशा महत्त्वाच्या तशा लहान लहान कामे जबाबदाऱ्या ही तेव्हढ्याच निष्ठेने पार पाडण्यातही कर्तृत्व पाहता येईल. मोठ्यांशी मोठे व लहानाशी लहान होऊन राहणे म्हणजे कर्तृत्व. बोलुन दाखवणे. उपदेश देणे यात जेव्हढे कर्तत्व आहे तेव्हढेच ते समोरच्याचे एैकुन घेण्यात समजुन घेण्यात हि आहे. यशाच्या एकाच शिखरावर असणाऱ्या दोन व्यक्ती चे कर्तृत्व हे वेगवेगळे असु शकते ते, त्यांच्या वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक परिस्थिती वर ते अवलंबून असते.
आणि बर्याचदा तर केवळ करण्यात व करुन दाखवण्यात नाही तर ‘let go’ अप्रोच मधे जास्त कर्तृत्व असावे. हे गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून लक्षात आलय. अनेकदा बाबांच्या कामाच्या पद्धतीवरूनही हे मी शिकत गेलो.
आजवर अशा बऱ्याच प्रसंगानी जीवनाला दिशा, वेग व नियंत्रित करण्याचे काम केले त्यातला हा एक अनुभव.
वडिलांनी किती साध्या आणि सोप्या शब्दात हसत खेळत हे पेरलं होत. याची जाणीव आज होते.
शेवटी त्यांनी ही त्यांच्याच मातीत पेरलं होतं त्यामुळे त्यावर किती व केव्हा मशागत करायची ती ही त्यांनी वेळो वेळी केलीच असणार, यात शंका नाहीच. आणि हो, आपल्या पिकाला टिड लागता कामा नये या साठीही त्यांच्या कडे कडक टिकट नाशक होते. ते ही त्यांनी बऱ्याचदा फवारलेले आहे. त्यांचे ते किस्से केव्हातरी….